Press Release

SNDT Women’s University
1, Nathibai Thackersey Road
Mumbai 400020
 
एसएनडीटी महिला विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि फ्रांस दूतावास यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार
एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ शशिकला वंजारी मॅडम उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रांस दूतावास यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार झाला त्या प्रसंगी उपस्थिती

मुंबई विद्यापीठ
प्रसिद्धी पत्रक
दिनांक – १३ जानेवारी, २०१८

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रांस दूतावास यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

मुंबई- उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि फ्रांस दुतावास यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये विद्यापीठामधून शिक्षण घेत असलेल्या आणि परदेशातील त्यांच्या पहिल्या व्यावसायिक अनुभवाचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी या सामंजस्य सहकार्यातून निर्माण होणार आहे. या करारान्वये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थ्यांना फ्रांस दूतावासांचे सहकार्य लाभणार आहे. ९ महिन्याच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे फ्रांस येथे विद्यार्थी पाठविले जाणार असून ५५,६०० एवढे मासिक विद्यावेतन या विद्यार्थ्यांना फ्रांस दूतावासातर्फे देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि फ्रांस दूतावास यांच्यातील हा पहिला शैक्षणिक सामंजस्य करार असून या कराराच्या माध्यमातून फ्रांस येथे जाऊन शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे, डेप्युटी कॉउन्सेलर सहकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग अरुणा अदिसियाम, फ्रेंच एज्युकेशन अटॅच, फ्रेंच इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे क्रिस्टॉप लेग्रीस, फ्रान्सचे कॉन्सुलेट जनरल मुंबईच्या मरीन रागानेट, अमृतादातर, कॅम्पस फ्रान्सचे जनरल रिप्रेझेंटेटिव्ह, वेस्ट झोन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, ग्लोबलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन कृतीबल गटाच्या निमंत्रक डॉ. अपूर्वा पालेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्यासह विद्यापीठातील फ्रेंच विभागाचे विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्गाची उपस्थिती होती. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सह सचिव सिद्धार्थ खरात आणि अरुणा अदिसियाम डेप्युटी कॉउन्सेलर सहकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या कराराबद्दल बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, या करारान्वये फ्रान्सच्या भाषा आणि समाजांबद्दल त्यांचे भाषा कौशल्य आणि त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीचे मौल्यवान ज्ञान फ्रेंच शाळांबाबत जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हा असणार आहे. त्याचबरोबर फ्रांस आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात संशोधन व नाविण्यपूर्ण बाबींवर एकत्रित अभ्यास करुन फ्रांस आणि भारत या दोन्ही देशातील सर्वसामान्य माणसांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सामंजस्य करारामुळे फ्रान्स आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये भाषेची देवाण घेवाण होईल त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी सांस्कृतिक परंपरेला अधिक चालना मिळेल. तसेच महाराष्ट्र आणि फ्रान्स यांच्यामधील रोजगाराला प्रोत्साहन मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले. आजच्या सामंजस्य करारामुळे चांगली सुरुवात झाली असून विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांना या करारामुळे शिक्षणक्षेत्रात सकारात्मक लाभ होणार असून विद्यार्थी आणि शिक्षकांना याचा फायदा होईल असे तावडे यांनी सांगितले. या करारामुळे महाराष्ट्रातील ७ ते १५ विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात अभ्यासाची दालने निर्माण करुन विविध कार्यशाळाच्या माध्यमातून हे सहजरित्या साधता येणार असून दोन्ही देशात एक सास्कृतिक देवाण-घेवाण याचे एक मोठे दालन यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कराराच्या माध्यमातून निवडक ८ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रांस दूतावासामार्फत पुढाकार घेतला जाणार असून विभागामार्फत राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकांना याबद्दल माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या करारान्वये फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर फ्रांस सरकारकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पीएचडी स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे.

लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव (जनसंपर्क)